मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महा जॉब्स’ पोर्टलचं आज लोकार्पण

Last Date : 06-07-2020

Overview

राज्यातल्या उद्योगात मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात हा हे पोर्टल सुरु करण्यामागचा उद्देश आहे. कंपन्यांना कुठले कामगार हवे आहेत याची माहिती या पोर्टलवर असणार आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखवले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेले “महाजॉब्स” हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तूरा असल्याचे नमूद केले. काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमीपुत्रांना  पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांसाठी मोबाईलवर “महाजॉब्स” नावाचे ॲप  उपलब्ध करून देण्याची सुचनाही उद्योग विभागाला केली.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्यासह उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी,  एमआयडीसीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, राज्याच्या प्रत्येक भागातील उद्योजक आणि रोजगार संधीच्या शोधात असलेले भुमिपुत्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

महाजॉब्स हा महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभाग, कामगार विभाग आणि कौशल्य विकास-उद्योजकता विभाग यांचा, रोजगार शोधणार्‍यांना उद्योजकांशी जोडण्यासाठीचा संयुक्त उपक्रम आहे. महाजॉब्स उद्योजकांना कुशल कामगार देऊन त्यांचे काम सुरळीत पार पाडण्यास मदत करते.

कोविड-१९ हे केवळ आरोग्य संकट नव्हे तर आर्थिक संकट म्हणून जागतिक पातळीवर ओळखले गेले. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १५% वाटा म्हणून देशातील सर्वाधिक उद्योग असणार्‍या महाराष्ट्राला उद्योगप्रक्रिया सातत्याने सुलभ व उद्योगप्रेमी ठेवण्याची गरज आहे. सध्याच्या संकटाला उत्तर देताना उद्योगाच्या मनुष्यबळाच्या गरजा भागविणे आवश्यक आहे.

कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन उद्योगाच्या दृष्टीकोनातून राज्याचे आर्थिक पुनरुज्जीवन करणे हे महाजॉब्सचे लक्ष्य आहे.

महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळितपणे पार पाडता यावे या उद्देशाने महाजॉब्स पोर्टल तयार केले गेले आहे. नोकरी शोधणा-या कामगारांना आणि उद्योजकांना सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचा महाजॉब्स पोर्टलचा सातत्याने प्रयत्न आहे.

महाजॉब्स पोर्टलची खालील उद्दिष्ट्ये आहेत :

  • नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक यांच्यामधील दुवा.
  • निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे.
  • उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे.
  • महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करणे.

महाजॉब्स पोर्टल Website Link : https://mahajobs.maharashtra.gov.in/Portal/Login